महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य; बसपाची आक्रामक भूमिका
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्याने बहुजनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.पाटील यांनी तात्काळ बहुजनांची माफी मागत नैतिकतेच्या आधारे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,अशी संतप्त प्रतिक्रिया बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शनिवारी व्यक्त केली.महाराष्ट्र हा केवळ फुले-शाहू-आंबेडकर आणि कर्मवीरांच्या पुरोगामी विचारांमुळे शिक्षित आणि पुढारला आहे.बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी या महापुरुषांचा त्याग आणि कष्टाची तुलना अशक्यच आहे.वर्णव्यवस्थेच्या जोखडात अडकलेल्या समाजाला, स्त्रियांना स्वातंत्र मिळवून देत फुले,आंबेडकरांनी शिक्षणाची दारे खुली केली.अशात केवळ वैचारिक अज्ञानामुळे आणि डोक्यातील बहुजनांबद्दल असलेल्या तिरस्कारामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक चौकटीतून बाहेर येवून त्यांनी या महापुरूषांचा जवळून अभ्यास करावा,असे आवाहन देखील अँड.संदीप ताजने यांनी केले आहे. पाटील यांना ‘भिकेत’ मंत्रीपद मिळाले आहे.कुठलेही कर्तृत्व नसतांना नेतृत्वकौशल्याचा अभाव असलेल्या पाटील यांना भाजपने स्थान दिले आहे. भाजप पक्षश्रेष्टींनी त्यांच्यावर आवर घालावी. यापूर्वी देखील त्यांनी महिलांबद्दल अपमानकारक वक्तव्य केले होते. त्यामुळे अशा बुरसटलेल्या विचारांनी माखलेल्या पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे असल्याचे अँपड.ताजने म्हणाले.
सापाने कात टाकली म्हणून त्याचे विष कमी होत नाही…
महाराष्ट्रात आणि देशात शिवशक्ती आणि भिमशक्ती हे कुणाचे ‘पेटंट’ नाहीये.प्रकाश आंबेडकर यापूर्वी एमआयएम,कॉंग्रेस सोबत होते. अनेकदा ते आघाड्या करीत आले आहेत. शिवसेनेने देखील भाजप सोबत युती तोडून नव्याने महाविकास आघाडी स्थापन केली आहे.कुठल्या पक्षाने कुणासोबत जायचे, हा सर्वस्वी संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय आहे.
पंरतु, महाराष्ट्रातील स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या मनात आणि मेंदूत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर प्रचंड असा विश्वास आहे.अढळ निष्ठा आहे आणि याच निष्ठेच्या आधारावर ज्या लोकांनी फुले-शाहु-आंबेडकरांचा वारंवार अपमान केला, ज्यांनी या राज्यात बाबासाहेबांच्या आंदोलनाला तोडण्याचे काम केले त्यांना धडा शिकवू.भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना सातत्याने दलित समाजाचे शोषण करण्यात आले.
सापाने कात टाकली म्हणून त्याचे विष कमी होत नाही. शिवसेना काल जशी होती तशी आजही आहे. त्यांच्या डोक्यात आंबेडकरवादाविषयी प्रेम असूच शकत नाही.या देशामध्ये ज्यांना राजकीय दृष्टया एकत्रित यायचे आहे त्यांना येवू द्या. पंरतु, महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज यानंतर आंबेडकरी निळ्या झेंड्याखाली एकत्रित येणार आहे.आणि तो अखंड निळा झेंडा केवळ बहुजन समाज पार्टीसोबत आहे.त्यामुळे शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्रित येण्यावर आम्हाला फारसे महत्व वाटत नाही.