गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथील आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकताच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना यशासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
महावीर महाविद्यालयाचे प्रा. गोपाळ गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यशाला कोणताही शॉर्टकट नाही. “अभ्यासात सातत्य हेच यशाचे खरे सूत्र असून, विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करून यश मिळवले पाहिजे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या भाषणात ते बोलत होते.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी टी.के. पाटील होते. त्यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेचे के. डी. पाटील यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक केले.
यावेळी अॅड. विजयकुमार कदम, सुनील पाटील, भैरू केसरकर, दीपक पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. संस्थापक प्राचार्य के. डी. पाटील आणि टी. के. पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी प्राचार्य तेजस पाटील, उपप्राचार्या निर्मला केसरकर, मुख्याध्यापिका एस. के. पाटील, श्रेयस पाटील, शिक्षिका नंदा देसाई, शोभा पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सत्कार समारंभाने विद्यार्थ्यांमध्ये पुढील शिक्षणासाठी नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला.