
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटना (सीटू) यांनी शुक्रवार, दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद व कलेक्टर कार्यालयासमोर एक दिवसीय कामबंद थाळी नाद मोर्चा सह निदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्यांची मांडणी करण्यात येणार आहे.
या बैठकीत शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यात ऑक्टोबर, नोव्हेंबर, व डिसेंबर महिन्यांचे थकीत स्वयंपाकी मदतनीस मानधन तात्काळ जमा करणे, शासन निर्णयानुसार विना चौकशी कामावरून कमी केलेल्या कामगाराना तात्काळ कामावर हजर करून घेणे, फेडरेशनच्या आंदोलनामुळे ५ जुलै २०२४ च्या ठरावा प्रमाणे स्वयंपाकी मदतनीसांच्या मानधनात केलेली एक हजार (१०००) रुपयांची वाढ तात्काळ लागू करणे, एप्रिल २०२४ पासून चे थकीत केळी व अंडी अनुदान ताबडतोब जमा करणे, इत्यादी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शालेय पोषण आहार ठेकेदार, स्वयंपाकी, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महिलांना या मोर्चात ताट व पळी (चमचा) सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनेच्या वतीने राज्य फेडरेशनचे अध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष कॉ. प्रा. ए. बी. पाटील यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.