
कागल, दि. 30: आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास कागल ते मुरगूड जाणारे मुख्य मार्गावर सिध्दनेर्ली नदीकिनारा येथील दूधगंगा नदीच्या पात्रात एक कंटेनर कोसळला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने नदीच्या पुलावरील संरक्षक लोखंडी पूल तोडून हा अपघात झाला.
या अपघातात कंटेनरचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील सरवाड येथील रहिवासी असलेला 28 वर्षीय चालक कालु राम चौधरी याने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कंटेनर (क्रमांक RJ-09-GC-2695) चालवत असताना हा अपघात घडवला.
चालकाचे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाले आणि त्यामुळे कंटेनरवरील नियंत्रण सुटून तो नदीपात्रात पडला.
या घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार विजय तुकाराम पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281 (सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि 324 (सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 (धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे) अंतर्गत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक पटेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.