कागल (प्रतिनिधी) : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यात जखमी किंवा मृत पावलेल्या नागरिकांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कागल नगरपरिषदेत ‘जनहित याचिका १९/२०२५ नुसार समिती’ गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेने नुकतीच एक जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे.
समिती स्थापनेची पार्श्वभूमी:
मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या पीआयएल १९/२०२३ (जनहित याचिका) बाबत सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, रस्ते खराब असल्यामुळे अपघात होऊन कोणी जखमी झाल्यास अथवा मृत्यू पावल्यास त्याची चौकशी करणे आणि नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यासाठी मुख्याधिकारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (District Legal Service Authority) यांचे सचिव यांची समिती स्थापन करण्याची सूचना केली होती.

समितीची जबाबदारी:
या आदेशानुसार, कागल नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन कोणी जखमी झाले असल्यास किंवा कोणाचा मृत्यू झाला असल्यास, त्याची चौकशी करणे, नुकसान भरपाई देणे व उच्च न्यायालय, मुंबई यांनी आदेशित केलेले इतर आनुषंगिक कार्यवाही करणे ही या समितीची मुख्य जबाबदारी असेल.
समितीमध्ये समावेश:
कागल नगरपरिषद, कागल व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर (District Legal Service Authority) यांचे सचिव व संबंधित अधिकारी यांची मिळून ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
| अ. क्र. | अधिकारी पदनाम | समितीतील पदनाम |
| १. | मुख्याधिकारी, कागल नगरपरिषद, कागल | अध्यक्ष |
| २. | सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर | सदस्य |
| ३. | पोलीस निरीक्षक, कागल पोलीस ठाणे, कागल | सदस्य |
| ४. | वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, कागल | सदस्य |
| ५. | सामान्य प्रशासन विभाग प्रमुख, कागल नगरपरिषद, कागल | सदस्य सचिव |