मुरगुड(शशी दरेकर) – सध्याच्या बिघडलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थितीला गांधी विचारांचा विसर हेच प्रमुख कारण असून ह्या भयाण परिस्थितीतुन बाहेर येण्यासाठी व देशाला स्थिर, मजबूत बनवण्यासाठी गांधी विचारांची गरज असल्याचे मत मा. प्रा.एस.डी. पाटील सर यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगुड व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा मुरगुड यांनी आयोजित केलेल्या महात्मा गांधी स्मृतिदिना निमित्त कर्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून “राष्ट्रपिता महात्मा गांधींना समजून घेताना” या विषयावर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदयी कार्यकर्ते मा.भिमराव कांबळे होते.
ते पुढे म्हणाले शेवटच्या माणसाला सोबत घेऊन जाण्याचे व त्याला स्थैर्य मिळवून देण्याचे तत्वज्ञान गांधी विचारात आहे. सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारा सांप्रदाईक सद्भावना निर्माण करणारा माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा आणि जातीअंता कडे जाऊन आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जाती भेद नष्ट करणारा समग्र मानवीय विचार म्हणजे गांधी विचार होय. देशामध्ये सर्वांगीणसुबत्ता निर्माण करणारा गांधी विचार सर्वानी आत्मसात करणे गरजेचे झाले आहे.गांधी समजून घेण्यासाठी तरुणांनी एक ना अनेक पुस्तके वाचणे गरजेचे झाले आहे.
यावेळी अध्यक्षस्थानावरून मा.भिमराव कांबळे म्हणाले,गांधी आंबेडकर विचार दोन नसून एकच आहेत.गांधी आंबेडकरांचा वरकरणी वैचारिक संघर्ष दिसत असला तरी तो संघर्षच नव्हता हे त्यातले अंतिम सत्य आहे. गांधी विचार हा आंबेडकर विचारला सोबत घेतल्या शिवाय पूर्ण होत नाही तसाच आंबेडकर विचार गांधी विचारला सोबत घेतल्या शिवाय पूर्ण होत नाही.
स्वयंघोषित गांधीवाद्यांनी बाबासाहेबांना समजून घेतला नाही स्वयंघोषित आंबेडकरवाद्यांनी गांधींना समजून घेतले नाही.त्याचा परिणाम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सुद्धा रायगड जिल्ह्यातील आपटी सारख्या गावात दलितांनी शिवलेलं पाणी आज ही पिले जात नाही.जो पर्यंत गांधी आंबेडकर शक्ती म्हणून देश भरात निर्माण होणार नाही तोवर जातीयवाद्यांचा सुरू असलेला देश विघातक संविधान विरोध नष्ट होणार नाही.संपूर्ण देशाला न्याय मिळवून देणारे संविधान टिकवण्यासाठी आपण सर्व एक होण्याचे आव्हान त्यांनी केले.
यावेळी मा.दलितमित्र प्रा.डी. डी. चौगले सर,मा.गजानन गंगापूरे सर,शिवप्रसाद बोरगाव,प्रधान सचिव प्रदीप वर्णे,विकास सावंत, विक्रमसिंह पाटील, कृष्णात कांबळे,प्रांजल कामत,जयवंत हावळ,पापा जमादार,सिकंदर जामदार, प्रा.चंद्रकांत जाधव, प्रा. सुनील डेळेकर, समाधान सोनाळकर, संजय घोडके, प्रा.दिलीप कांबळे, विजय भोई ,बाळासाहेब कांबळे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.
स्वागत कार्याध्यक्ष शंकरदादा कांबळे उंदरवाडीकर यांनी केले. प्रस्ताविक बी.एस.खामकर यांनी केले.व आभार अध्यक्ष बबन बारदेस्कर यांनी केले.तर सूत्रसंचालन सचिन सुतार यांनी केले.