कागल : श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर, प्रकल्पग्रस्त वसाहत, कागल येथे ‘पौष्टिक पंधरवडा’ अभियानांतर्गत पारंपरिक ‘हादगा’ उपक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या पारंपरिक हादग्याच्या आणि नावीन्यपूर्ण गाण्यांनी झाली. गाण्यांच्या तालावर फेर धरत विद्यार्थिनींनी आपली समृद्ध लोकसंस्कृती जिवंत ठेवली. यावेळी विद्यार्थ्यांनी घरून आणलेले विविध पौष्टिक पदार्थ (खिरापत) मध्यभागी आकर्षकरीत्या ठेवण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व मार्गदर्शनात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे महत्त्व अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगितले.
त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या, “बालवयात योग्य आणि संतुलित आहार मिळणे हे शारीरिक व मानसिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी चिप्स, कुरकुरे, पॅकबंद अन्नपदार्थ आणि शीतपेयांचे अतिसेवन टाळून घरगुती, ताज्या व पौष्टिक अन्नाला नेहमी प्राधान्य दिले पाहिजे.
आपल्या रोजच्या आहारात डाळी, कडधान्ये, नाचणी, ज्वारी, बाजरी, हिरव्या पालेभाज्या आणि मोसमी फळांचा जास्तीत जास्त समावेश करावा. नियमित व्यायाम, स्वच्छता आणि पुरेशी झोप या गोष्टीही आरोग्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आजच्या या हादगा उपक्रमातून पारंपरिक खाद्यसंस्कृतीच्या जतनाबरोबरच आरोग्यदायी जीवनशैलीचा मोलाचा संदेश मिळतो. विद्यार्थ्यांनी स्वतः पौष्टिक आहार घ्यावा आणि आपल्या कुटुंबातही याबाबत जनजागृती करावी.”
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शेंगदाण्याचे लाडू, ज्वारीचे धपाटे, नाचणीच्या आंबोळ्या, विविध पौष्टिक फळे आणि पारंपरिक पदार्थांचा समावेश असलेले खाद्यपदार्थ आणले होते. उपक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना आनंदाने खिरापत वाटून घेत सहभोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे शारीरिक महत्त्व समजण्यासोबतच एकमेकांना मदत करणे, सहकार्य करणे आणि आपली लोकसंस्कृती जपण्याचे उत्तम संस्कार मिळाले. शाळेच्या या स्तुत्य उपक्रराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.