कागल (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान योजनेअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज, २३ सप्टेंबर रोजी येथील बहुउद्देशीय सभागृह, तहसील कार्यालय येथे कागल मंडळात फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या अदालतीमध्ये एकूण ३३ फेरफार नोंदी मंजूर करण्यात आल्या. यात ८ नोंदणीकृत फेरफार, १७ अनोंदणीकृत फेरफार, १ तक्रार/हरकत नोंद आणि ७ वारसा ठरावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत ७/१२ पत्रकावर पतीच्या नावाबरोबर पत्नीचे नाव नोंदवण्यासाठी एकूण ७ फेरफार नोंदी मंजूर करण्यात आल्या. ही योजना महिलांना मालमत्तेत समान हक्क देण्यासाठी आहे, ज्यामध्ये पतीच्या संमतीने पत्नीचे नाव ७/१२ उताऱ्यावर सह-मालक म्हणून जोडले जाते.

याशिवाय, भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील नागरिकांसाठी ओळखपत्र आणि जातीचे दाखले देण्यासाठी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आयुष्यमान भारत/गोल्डन कार्डची २६ नोंदणी करण्यात आली.

या कार्यक्रमास गोसावी समाज, वडर समाज आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव, महसूल नायब तहसीलदार सुशांत कांबळे, मंडळ अधिकारी कुलदिपक गवंडी, अ.शा. गटप्रवर्तक सुप्रिया गुदले, अशा सेविका सुगंधा मोटे व धनश्री पाटील, आरोग्य मित्र, ग्राममहसूल अधिकारी यांनी विशेष सहभाग घेतला.