मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज Rishabh Pant ऋषभ पंतला फलंदाजी करताना पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला मैदान सोडावे लागले. या दुखापतीमुळे तो मालिकेबाहेर होण्याची शक्यता आहे, अशी चिंता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अथर्टनने व्यक्त केली आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपताना भारताने ४ गडी गमावून २६४ धावा केल्या होत्या, पण पंतच्या दुखापतीमुळे संघावर चिंतेचे ढग दाटले आहेत. दिवसाच्या उत्तरार्धात, ख्रिस वोक्सच्या एका ओव्हरपीच्ड चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करताना पंतच्या उजव्या पायाला जोरदार फटका बसला. वेदना असह्य झाल्याने त्याला तात्काळ मैदानाबाहेर नेण्यात आले.

अथर्टनने स्काय स्पोर्ट्सवर बोलताना या दुखापतीचे गांभीर्य अधोरेखित केले. “जर पंत या सामन्यातून आणि मालिकेतून बाहेर पडला, तर तो भारतासाठी खूप मोठा धक्का असेल,” असे अथर्टन म्हणाला. “२६४ धावांवर ४ गडी असताना, नवीन चेंडू बाकी असताना, इंग्लंड उद्या भारताला लवकर बाद करू शकते. पण जर तो फलंदाजीला परतला, तर तो खेळाचे चित्र बदलू शकतो. त्यामुळे अजूनही अनिश्चितता आहे. पण ही दुखापत खूप गंभीर दिसत आहे, कारण अन्यथा त्याला स्ट्रेचरवरून नेण्यात आले नसते,” असेही अथर्टनने नमूद केले.
पंतला तातडीने स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे आणि बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे. या दुखापतीमुळे तो उर्वरित सामन्यात खेळू शकेल की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता आहे.