मुरगूड (शशी दरेकर) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड , राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 13/ 12/ 1942 गारगोटी स्वातंत्र्य लढ्यातील शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतिप्रित्यर्थ हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या घटनेला जवळपास 82 वर्षे लोटली असली तरीसुद्धा त्यांच्या आठवणी आज देखील क्रांतीज्योतीच्या रूपाने तितक्याच ताज्या आहेत.
आपल्याच भागातील संकेश्वरचे हुतात्मा करवीरया स्वामी, कलनाकवाडीचे हुतात्मा नारायण वारके ,सेनापती कापशीचे हुतात्मा शंकरराव इंगळे, मुरगुडचे हुतात्मा तुकाराम भारमल,नानीबाई चिखलीचे हुतात्मा मल्लू चौगुले, जत्राट गावचे हुतात्मा बळवंत जबडे, खडकलाट गावचे हुतात्मा परशुराम साळुंखे हे क्रांतिकारक गारगोटी स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मे झाले आणि आपल्या नावाबरोबर आपल्या गावचे नाव सुद्धा भारताच्या समग्र इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवले . या हुतात्मांच्या स्मरणार्थ गारगोटी येथे सात पाकळ्यांचे भव्य स्मारक उभारलेले आहे. हे स्मारक आजही येणाऱ्या पिढीला नवीन स्फूर्ती, नवी चेतना देत खंबीरपणे उभे आहे.
महाविद्यालयाचे कार्यतत्पर प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे यांच्या हस्ते क्रांतीज्योतीला पुष्पहार अर्पण करून क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले.यावेळी ते म्हणाले की, आज 21व्या शतकात स्वातंत्र्याचा उपभोग घेत असलेल्या आजच्या युवा पिढीला हा गारगोटीचा रणसंग्राम समजावा, त्यांच्यापर्यंत हा इतिहास पोहोचवा त्याचबरोबर या लढ्यातील क्रांतिकारकांच्या त्यागाची आठवण सतत राहावी या उद्देशाने आजचा हा हुतात्मा दिन म्हणून साजरा होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे नूतन उपप्राचार्य डॉ उदयकुमार शिंदे यांनी 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यातील स्मृतींना उजाळा दिला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य समन्वयक डॉ. एम ए कोळी, प्रा रामचंद्र पाटील, प्रा टी एच सातपुते, लेफ्ट. विनोदकुमार प्रधान आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक प्रा संजय हेरवाडे यांनी केले. आभार प्रा. दिगंबर गोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा सुशांत पाटील यांनी केले.