मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाना मुरगुडातील लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सुरुवात झाली. येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धेतील विजेत्या मल्लांची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणार आहे. उद्घाटन कार्यवाह अण्णासाहेब थोरात यांच्या हस्ते, शिवराजचे प्राचार्य जी. के. भोसले, गर्ल्सच्या मुख्याध्यापिका भारती सुतार, संभाजी आंगज, उदय शहा, सुहास खराडे, सुखदेव येरूडकर, एकनाथ पोतदार, तालुका क्रीडा समन्वयक एकनाथ आरडे, विष्णू मोरबाळे, महादेव सुतार आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
बटू जाधव यांनी मनोगत मांडले. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रकाश खोत, के. बी. चौगुले, बटू जाधव, बाळासाहेब मेटकर, रवींद्र पाटील, आनंदा खराडे, दयानंद खतकर, सागर देसाई हे काम पाहत आहेत.
स्वागत व प्रास्ताविकात मुख्याध्यापिका भारती सुतार म्हणाल्या, दिवंगत लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रयत्नातून कुस्तीला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. आमच्या शाळेतून अनेक नामवंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महिला मल्ल घडल्या. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सूत्रसंचलन व्ही. बी. पाटील यांनी केले. आभार दादा लवटे यांनी मानले.