कागल : कागल नगरपरिषदेच्यावतीने राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन १३ ते १८ जानेवारीदरम्यान करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे २१ वे वर्ष आहे. रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत केले.
शनिवारी (ता.१३) पहिले पुष्प रविकिरण पराडकर (निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई) यांचे ‘वर्दीतील विनोद आणि कविता’, रविवारी (ता. १४) दुसरे पुष्प साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रा. कृष्णात खोत यांचे ‘मराठी साहित्य आणि समाज’ या विषयावर गुंफले जाणार आहे. यावेळी प्रा. खोत यांचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सोमवारी (ता.१५) तिसरे पुष्प सुविनय दामले (कुडाळ, सिंधुदुर्ग) यांचे ‘निरोगी आयुष्याची शंभर वर्षे ‘ या विषयावर, बुधवारी (ता. १७) चौथे पुष्प गणेश शिंदे (अहमदनगर) यांचे ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर, गुरुवारी (ता.१८) भास्करराव पेरे-पाटील (पाटोदा, छत्रपती संभाजीनगर) यांचे ‘आदर्श गाव आणि माझी भूमिका’ या विषयावर होणार आहे. हिंदुराव घाटगे विद्यामंदिरच्या पटांगणावर साने गुरुजी विचारमंच येथे सायंकाळी सहा वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. पत्रकार परिषदेस व्याख्यानमाला प्रमुख सुरेश रेळेकर, वि. म. बोते यांच्यासह मान्यावर उपस्थित होते.