मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड पोलीस ठाणे हद्दीत मुरगूड ते चिमगाव रस्त्यालगत गटारीत पडून एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळासो शिवाप्पा लोंढे (वय ५८, रा. सोनगे, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अकस्मात मयत रजि. नं. ३१/२०२५ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत बाळासो लोंढे हे दि. ०२/०७/२०२५ रोजी दुपारच्या सुमारास मुरगूड येथे एका लग्नकार्यासाठी गेले होते. लघुशंकेसाठी गेले असताना त्यांचा पाय घसरून ते भुते हॉलजवळ रस्त्याच्या पलीकडील गटारीत पालथे पडले. गटारीतील पाणी नाकातोंडात गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती वर्दीदार अमोल बाळासो लोंढे (रा. सोनगे, ता. कागल) यांनी मुरगूड पोलिसांना दिली.

दि. ०८/०७/२०२५ रोजी सकाळी ०८.४५ वाजेच्या पूर्वी ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे. सायंकाळी ५ वाजता मयत झाल्याची माहिती मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. सहायक फौजदार आर.पी. जरग यांनी याप्रकरणी नोंद घेतली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल ढेकळे यांना प्राथमिक तपासासाठी घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. बी. कुंभार करत आहेत. या घटनेत कोणताही घातपाताचा संशय नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.