कागल (विक्रांत कोरे) : सोन्या -चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे १३ लाख ८० हजार रुपयांचा दरोडा अज्ञात चोरट्यानी कागल येथे घातला .हा चोरीचा प्रकार येथील मुजावर गल्लीतील बाबासाहेब अहमद काझी यांच्या घरी रविवारी रात्री घडला. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.
बाबासाहेब काझी , घर नंबर 305 ,मुजावर गल्ली, कागल, सध्या राहणार- ई विंग, फ्लॅट नंबर 806, विराज सिटी कागल, यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली आहे .
कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, श्री काझी यांचे कागल बस स्थानका नजीकच्या बोगद्याजवळ चिकन सेंटर आहे. रविवारी रात्री घराचा बंद दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने घरात आत प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटाचे दार अज्ञात हत्याराने उचकटून काढले.
त्यातील लॉकरमध्ये असलेले रोख रुपये बारा लाख. पाचशे रुपयांच्या चलनी नोटा चोरट्यानी घेतल्या. त्याच्या लगतचे कपाट मोडून काढले. त्या कपाटात असलेल्या पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या ,त्याची किंमत रुपये एक लाख तसेच, एक किलो चांदीचे दागिने ,त्याची किंमत सुमारे 80 हजार रुपये असा एकूण १३ लाख ८० हजार रुपयाच्या मुद्देमालावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला.
कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार हे पुढील तपास करीत आहेत.