कोल्हापूर : पूरस्थितीचा फटका जसा नागरिकांना बसला तसाच तो जिल्ह्यातील पशुधनालाही बसला आहे. या पूरस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पशुधन जोपासण्यासंदर्भात सध्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. ही अडचण ओळखून पशूधन चाऱ्यासंदर्भात जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले.
मौजे वरंगे, पाडळी येथे जैन एलर्ट ग्रुपच्या वतीने सुमारे 300 टन मूर ग्रास (चारा) वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.या चारा वाटपामुळे पशुधन जोपासण्यास निश्चित मदत होईल असा आशावाद व्यक्त करून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, पूरबाधित गावांमध्ये पशुखाद्य युनिट सुरू करण्याबाबत बचत गटांनी पुढाकार घेतल्यास त्यांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, आपत्तीच्या प्रसंगी मदतीसाठी जैन समाजाचे नेहमीच योगदान असते. त्यांच्या या कार्यातून जीवदया दिसून येते. हा स्तुत्य उपक्रम असून या कार्याची व्याप्ती आणखीन वाढावी अशा शब्दात सदिच्छा दिल्या. या ग्रुपच्यावतीने वरंगे, पाडळी, चिखली आणि आंबेवाडीतील सुमारे 3 हजारांहून अधिक जनावरांना मूर ग्रासचे (चारा) वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी कुणाल शहा, समीर शहा, आनंद शहा, जितेंद्र शहा, निरज शहा, विनित जैन, किशोर शहा आदी उपस्थित होते.